
परभणी, दि.19:- 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूकीची प्रक्रीया पार पाडतांना अतिशय काळजी घेवून मतदान केंद्र अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी पार पाडावी. निवडणूकीच्या प्रक्रीयेत समाविष्ठ असणाऱ्या अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य व जबाबदाऱ्या सचोटीने पार पाडाव्यात तसेच निवडणूकीच्या कामात गैरहजर राहिल्यास त्यांच्यावर नियमानूसार कडक कारवाई करण्यात येईल. असे निर्देश निवडणूक प्रशिक्षण प्रमुख उपजिल्हाधिकारी डॉ.संजय कुंडेटकर यांनी दिले.
राखीव मतदान केंद्र अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी निवृत्ती गायकवाड प्रमुख उपस्थित होते.
पुढे बोलतांना डॉ.कुंडेटकर म्हणाले की, भारत निवडणूक आयोगाने मतदानाच्यावेळी मतदान केंद्रावर किमान सुविधा असायला हव्यात असे निर्देश दिले असून मतदान केंद्रावर फर्निचरच्या उपलब्धतेनूसार टेबल व साहित्याची विहीत पध्दतीने रचना करावी तसेच केंद्रावर पोलिस बंदोबस्त हा केंद्राच्या बाहेरच्या परिसरात राहून त्यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कार्य करावे अशा सुचनाही त्यांनी दिल्या. पदवीधर मतदारसंघासाठी होणारे मतदान हे मतपेटीच्या माध्यमातून होणार आहे या मतदानासाठी ईव्हीएम वापरावयाची तरतूद नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच यावेळी मतदान पेटी सिलबंद करण्याच्या पध्दतीचे प्रात्यक्षिक करुन दाखविण्यात आले. आदर्श मतदान केंद्राची रचना, मतदान करुन घ्यावयाची प्रक्रिया, कर्तव्य व जबाबदाऱ्या, मतदान पेटी, केंद्राची रचना, केंद्राध्यक्षांची कार्ये, मतदानाची प्रक्रिया याचीही त्यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे उपस्थितांना माहिती दिली. या प्रशिक्षणास विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
-*-*-*-*-
