
जिल्ह्यात 2 डिसेंबरपासून शाळा सुरु
परभणी, दि. 2 :- जिल्ह्यातील महापालिका क्षेत्र वगळता दि. 2 डिसेंबर, 2020 पासून टप्प्याटप्प्याने प्रथम वर्ग दहावी व बारावी व तदनंतर नववी व अकरावीचे वर्ग सुरु होणार आहेत. जिल्ह्यातील शाळा सुरु होण्याच्या दृष्टीने कोव्हिड-19 च्या अनुषंगाने शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे आरटीपीसीआर चाचणी करण्यात आलेली आहे. तसेच शाळेचे निर्जंतुकीकरण, शाळेत हॅन्ड वॉश मशीन, थर्मल गन, ऑक्सिमीटर, उपलब्ध करण्याबाबतच्या सूचना शाळांना देण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी दिली.
विद्यार्थी उपस्थितीसाठी पालकांचे संमतीपत्र घेण्यात आलेले आहेत. दि. 2 डिसेंबर, 2020 पासून दहावी व बारावीचे प्रत्यक्ष वर्ग सुरु होणार आहेत. दीर्घ कालावधीच्या प्रतिक्षेनंतर प्रत्यक्ष शाळेत विद्यार्थी उत्साहात उपस्थित राहणार आहेत. कोव्हिड-19 च्या अनुषंगाने शाळेनेही पूर्ण तयारी केलेली आहे. जिल्ह्यातील 399 शाळा सुरु होत असून इयत्ता दहावीची 2 हजार 26 व इयत्ता बारावीची 46 हजार 585 अपेक्षित विद्यार्थी संख्या असणार आहे. तसेच पालकांनीही कोव्हिड-19 च्या खबरदारीच्या उपायांचे पालन करुन (मास्क व सोशल डिस्टन्सिंग) आपल्या पाल्यास शाळेत पाठवावे. आरटीपीसीआर चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आढळून आलेले शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी ज्या शाळेचे असतील त्या शाळा पाच दिवस बंद राहतील तर ज्या शाळांचे आरटीपीसीआर चाचणी अहवाल अप्राप्त आहेत त्यांनी अहवाल प्राप्त होताच शाळा सुरु करावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी दिले आहेत.
-*-*-*-*-
