Maharshtra Marathi News Nanded Marathi News

 आजपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा होणार सुरु -जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

नांदेड (जिमाका) 1  : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घेवून २ डिसेंबरपासुन समविषम पध्दतीने एक दिवसआड शाळा सुरु करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. शाळा सुरु करण्यासाठी सर्व मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, शाळा वाहतूक समिती, कोरोना प्रतिबंधक समिती, स्थानिक प्रशासन, आरोग्य केंद्र या यंत्रणांच्या समन्वयातून योग्य ती खबरदारी घेऊन शाळा सुरु करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटणकर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी नियोजनाप्रमाणे खात्री करुन शाळा सुरु करण्यास मुभा दिली.

 

कोविडचा संसर्ग लक्षात घेता जिल्हा प्रशासनासह खाजगी संस्थाचालकांनीही याबाबत अधिक दक्षता घेवून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवावा असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे केले आहे.  शिक्षकांच्या आरटीपीसीआर चाचण्या आणि त्यांचे निकाल येण्यासाठी लागणारा वेळ याबाबी लक्षात घेवून इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा २ डिसेंबरपासुन सुरु करण्याचे जिल्हा प्रशासनाने अगोदरच जाहिर केले होते. गर्दी टाळण्यासाठी प्रत्यक्ष अध्यापनवर्गात इयत्ता दहावी, बारावीतील विदयार्थीं सम तारखेला व इयत्ता नववी व अकरावीचे विदयार्थीं विषम तारखेला एक दिवसआड शाळेत उपस्थित राहतील. शाळा सुरु करतांना शासन परिपत्रकामध्ये नमुद केलेल्या सर्व मार्गदर्शक सुचनांची सर्व स्तरावरुन काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी असे शासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

 

जिल्हयात इयत्ता नववी ते बारावीच्या एकुण ८५८ शाळांतील १० हजार ६८६ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोविड तपासणी पुर्ण झालेली आहे. त्यापैकी ९८ कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉजिटिव्ह आले आहेत. पॉजिटिव्ह कर्मचाऱ्यांनी इंडियन कॉन्सील फॉर मेडीकल रिसर्च आयसीएमआर प्रोटोकॉलच्या मार्गदर्शक निर्देशकांची अंमलबजावणी करावी, अशाही सूचना दिल्या आहेत.

 

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे यांनी कोविडची परिस्थिती पाहता सर्व शाळांनी मास्क, साबण, सॅनिटायझर व सामाजिक अंतर या त्रिसुत्रीचे पालन करावे. तसेच वर्ग खोल्या, शालेय परिसर, स्वच्छतागृह निर्जंतुकीकरण करुन व आवश्यक ती योग्य खबरदारी घेवूनच शाळा सुरु कराव्यात, अशा सुचना दिल्या.

00000

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: