Maharshtra Marathi News Nanded Marathi News

ऑनलाईन अर्ज करुनही पिक विमा जमा न झाल्यास कृषि कार्यालयास करावा संपर्क 

नांदेड (जिमाका) दि. 30 :- ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने पूर्व सूचना देऊन शासनाच्या निकषाचे पालन केले आहे अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली नसल्यास त्यांनी तालुका कृषि कार्यालय किंवा विमा कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. यात अनेक प्रकरणात बँक खाते क्रमांक चुकीचे असल्याने विमा कंपनीमार्फत नुकसान भरपाई रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नसल्याचे निदर्शनास येत आहे.

नांदेड जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2020 मध्ये काही भागामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पिक विम्याच्या निकषानुसार स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत गारपीट, भुस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास ढगफुटी अथवा विज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे वारंवार केले होते. ऑनलाईन पध्दतीने ईमेल, ॲप व टोल फ्री क्रमांकाद्वारे तसेच विमा कंपनी, कृषि विभाग व महसुल विभाग यांच्याकडे नुकसानीची पुर्व सूचना देण्याबाबत सांगितले होते. त्यानुसार जिल्ह्यातील साधरणत: 64 हजार शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत पुर्वसुचना कंपनीस दिल्या होत्या. या सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करुन त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानीच्या प्रमाणात नुकसान भरपाई देण्याच काम संबंधित विमा कंपनीतर्फे चालु आहे.

ज्या शेतकऱ्यांचे पिक कापुन शेतात ठेवल्यानंतर (काढणी पश्चात) पावसामुळे पिकाचे नुकसान झाले होते असे साधारणत: 12 हजार शेतकऱ्यांनी विमा कंपनीस पुर्व सुचना दिल्या होत्या. त्या शेतकऱ्यांचे देखील विमा कंपनीद्वारे नुकसान भरपाई देण्याचे काम सुरु आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसान या बाबीसाठी विमा कंपनीने 64.89 कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर केली असून ज्या शेतकऱ्यांनी कंपनीकडे सुचना दिली आहे अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा करण्यात येत आहे.

सरसगट पिक विमा हा उत्पादनाच्या आकडेवारीवर आधारीत असतो. मागील सात वर्षातील सर्वोत्तम पाच वर्षाच्या सरासरीचे 70 टक्के एवढे उंबरठा उत्पन्न काढले जाते. चालु वर्षाच्या उत्पादकतेची आकडेवारी काढण्यासाठी प्रत्येक महसुल मंडळामध्ये 12 पिक कापणी प्रयोग महसुल जिल्हा परिषद व कृषि विभागामार्फत घेतले जातात. चालु वर्षाच्या उत्पादकतेच्या सरासरीची उंबरठा उत्पादनाशी तुलना केली असता ज्या महसुल मंडळामध्ये चालु वर्षाची उत्पादकता उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी येते तेथे त्या तुलनेत पिक विमा लागु होतो. ही आकडेवारी सर्व यंत्रणांकडून गोळा करुन पिक विमा कंपनीस सादर करण्याचे काम सुरु आहे. सदरील आकडेवारी विमा कंपनीस पोहोचल्यानंतर साधारनत: एक महिन्यानंतर उत्पादकता कमी आलेल्या महसुल मंडळामध्ये पिक विमा मंजूर होणार आहे.

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: