National News

रक्त पिशवीच्या दराबाबत आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामार्फत दर निश्चिती 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- जिल्ह्यातील गरजुंना रक्त पुरवठा वेळेवर व्हावा व कोणत्याही रुग्णाला रक्त पिशवीसाठी तिष्ठत बसावे लागू नये यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे कठोर नियमावली केली आहे. रक्त पिशवीच्या दराबाबत डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्यामार्फत योग्य दर निश्चिती करुन संनियंत्रण करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सूचना दिल्या. आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली रक्तसाठा व पुरवठा याबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी प्रदिप कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे डॉ. वाय. एच. चव्हाण व डॉ. समीर आणि सर्व खाजगी ब्लड बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्ह्यातील उपलब्ध असलेला रक्तसाठा व रुग्णांकडून केली जाणारी मागणी याची एकत्रीत माहिती प्राप्त होण्यासाठी सर्व ब्लड बँकेने दररोज रक्तगट निहाय किती साठा आहे त्याची माहिती देणे बंधनकारक असेल. थालेसिमियाच्या लाभार्थ्यांना नियमित रक्त पुरवठा करणे, जिल्हा शल्यचिकित्सामार्फत सर्व ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालयात ब्लड स्टोअरेज युनिट तयार करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी दिले. रक्तदानाची चळवळ जिल्ह्यात वाढावी यावर सर्वांचा सहभाग घेत आठवड्यातून किमान दोन वेळा ब्लड कॅम्प अर्थात रक्तदान शिबीर आयोजित करण्याबाबतही या बैठकीत निर्णय झाला. उपलब्ध असलेला रक्तसाठा सर्वांना सहज कळावा यादृष्टिने शासकिय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने सॉफ्टवेअर तयार करुन दररोज रक्त गटनिहाय किती रक्तसाठा आहे याची माहिती गुगलसीटद्वारे तयार करुन ती उपलब्ध करण्याचेही या बैठकीत ठरविण्यात आले. नांदेड जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होणार नाही आणि लाभार्थ्याला अथवा गरजूला लवकरात लवकर रक्त मिळेल याची खबरदारी घ्यावी अशा स्पष्ट सुचना जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी सर्व रक्तपेढ्यांना दिल्या.

0000

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: