
नांदेड, दि. 24 :- राज्यातील इयत्ता ०९ वी ते इयत्ता १२ वी चे वर्ग २३ नोव्हेंबर, २०२० पासून सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला असून त्याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना देखील निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. तथापि कोविड-19 ची स्थिती लक्षात घेवून जिल्हाप्रशासनातर्फे नांदेड जिल्ह्यातील शाळा, आश्रमशाळा, वसतिगृह १ डिसेंबर, २०२० पर्यंत सुरु न करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी घेतला.
१५ जून, २०२० च्या शासन परिपत्रकान्वये स्थानिक परिस्थितीनुसार शाळा टप्प्या-टप्प्याने सुरु करण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त यांचे सहाय्याने संबंधित शाळा व्यवस्थापन समिती यांना प्रदान करण्यात आलेले आहेत. या अंतर्गत हा निर्णय घेतला आहे. तसेच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये यासाठी विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
नांदेड जिल्ह्यातील सद्यस्थितीत अॅक्टीव्ह रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ, दिवाळी सणाच्या कालावधीनंतर मोठ्या प्रमाणात नांदेड जिल्ह्यात नागरिकांची ये-जा झाल्याने कोविड-१९ च्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने होणारे संभाव्य परिणाम आणि शालेय व्यवस्थापन समिती व पालक संघ यांचेकडून प्राप्त झालेले अभिप्राय लक्षात घेता सद्यस्थितीमध्ये नांदेड जिल्ह्यातील इयत्ता ०९ वी ते इयत्ता १२ वी चे वर्ग, आश्रमशाळा व वसतिगृह अशा परिस्थितीमध्ये सुरु करणे उचित ठरणार नाही, अशी खात्री झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.
१ डिसेंबर, २०२० नंतर शाळा सुरु करावयाच्या कार्यवाहीबद्दलचा निर्णय व सूचना स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
