Maharshtra News

करोना बाधिताच्या मृत्यूनंतर ‘दंगल’; डॉक्टरांना लाथाबुक्क्यांनी मारहाण, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनीही प्रत्युत्तर

नगर: उपचार सुरू असलेल्या करोना बाधिताचा मृत्यू झाल्यानंतर संतापलेल्या नातेवाईकांनी रुग्णालयात तोडफोड आणि डॉक्टरांना धक्काबुक्की केली. तर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनीही याला प्रत्युत्तर दिल्याने चांगलाच राडा झाला. या प्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी आल्या असून पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या सुमारे २५ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे.

संगमनेर जवळच्या घुलेवाडी येथील एका खासगी रुग्णालयात ही घटना घडली. राहाता तालुक्यातील हसनापूर येथील एका रुग्णावर तेथे उपचार सुरू होते. उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाला. मात्र, व्हेंटिलेटर बंद केल्याने आणि उपचारात हलगर्जीपणा झाल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. यावरून त्यांनी रुग्णालयात तोडफोड केली. डॉ. स्वप्नील भालके व डॉ. जगदीश वाबळे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. यासंबंधी डॉ. भालके यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून पोलिसांनी आठ ते दहा जणांविरूद्ध दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे.

रुग्णाचे नातेवाईक समीर शेख यांनीही पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आमच्या रुग्णाचा मृत्यू झालेला असताना त्यांचा मृतदेह ताब्यात देण्यासाठी रुग्णालयाच्या बिलाचे दीड लाख रुपये भरण्यास सांगितले. आमच्याकडे पैसे नव्हते. त्यावेळी काही लोकांच्या मदतीने डॉक्टरांनी आम्हाला धक्के मारत रुग्णालयाबाहेर काढले. त्यानंतर आणखी काही जण तेथे आले. त्यांनी रुग्णालयाबाहेर उभ्या असलेल्या आमच्या जीपचे लाकडी दांडक्यांनी नुकसान केले, असे शेख यांनी फिर्यादित म्हटले आहे. समीर शेख यांच्या तक्रारीवरून डॉ. जगदीश वाबळे यांच्यासह आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, करोना संसर्गाच्या सुरुवातीपासूनच संगमनेर तालुका हा नगर जिल्ह्यातील करोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. करोनाची लागण होऊन मृत्यू होण्याचे प्रमाणही तालुक्यात मोठे आहे. मात्र, त्यावरून रुग्णालयात डॉक्टर व रुग्ण यांच्यातच वाद व हाणामारी होण्याची अशी घटना प्रथमच घडली आहे. या घटनेने डॉक्टर वर्गात भीती पसरली असून संगमनेर पोलीस घटनेचा तपास करीत आहेत. अद्याप कोणाविरुद्धही कारवाई करण्यात आलेली नाही.

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
%d bloggers like this: