
अहमदनगर: महावितरणची घरगुती, व्यापारी, औद्योगिक (लघुदाब) ग्राहकांकडे वीज बिलाची एकट्या नगर जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून तब्बल १३२ कोटी ७ लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. यामध्ये तब्बल १ लाख ५६ हजार ग्राहकांनी एप्रिल महिन्यापासून वीज बिलापोटी महावितरणला एकही रुपया दिलेला नाहीये. या ग्राहकांचीच वीज बिलाची थकबाकी ही तब्बल ७६ कोटी २७ लाख रुपये झाली आहे.
सर्वसामान्यांना आलेल्या अव्वाच्या सव्वा वीज बिलाचा प्रश्न राज्यात सध्या चांगलाच पेटला आहे. लॉकडाउनच्या काळात प्रत्यक्ष मीटर वाचन शक्य नसल्याने वीजग्राहकांना आधीच्या तीन महिन्यात वीज वापराच्या आधारे अंदाजित बिल देण्यात आले होते. मात्र या काळात अनेकांना अवाच्या सव्वा वीज बिल आल्याच्या तक्रारी आल्या. त्यामुळे वीज बिलात सवलत मिळेल, या आशेने अनेकांनी हे बिल भरले नव्हते. मात्र आता वाढीव वीज बिले भरावीच लागतील, असे संकेत राज्य सरकारने दिले असल्याने त्याअनुषंगाने महावितरणची यंत्रणाही कामाला लागली आहे.
एकट्या नगर जिल्ह्याचा विचार केल्यास या जिल्ह्यात एक एप्रिल ते १७ नोव्हेंबर या काळात घरगुती, व्यापारी, औद्योगिक (लघुदाब) या अकृषक ग्राहकांकडे तब्बल १३२ कोटी ७ लाख रुपये वीज बिलापोटी थकबाकी झाली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यामध्ये ६ लाख ७५ हजार अकृषक ग्राहक आहेत, त्यापैकी तब्बल १ लाख ५६ हजार ग्राहकांनी एप्रिल महिन्यापासून वीज बिलापोटी महावितरणला एकही रुपया दिला नाही. या १ लाख ५६ हजार ग्राहकांची एप्रिल महिन्यापासूनची थकबाकी ही ७६ कोटी २७ लाख रुपये झाली असल्याचे महावितरणमधून सांगण्यात आले. ही थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणची यंत्रणा कामाला लागली आहे.
