
पुढील वर्षी २०२१ मध्ये होणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षा मे महिन्यापूर्वी घेतल्या जाणार नाहीत, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली….SSC HSC Exams 2021: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या यंदाच्या परीक्षा मे २०२१ पूर्वी होणार नाहीत, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. करोना व्हायरस महामारी स्थितीमुळे परीक्षा मे महिन्याच्या आधी होणार नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं.
सर्वसाधारणपणे बारावीची बोर्डाची परीक्षा फेब्रुवारी महिन्यात तर दहावीची परीक्षा मार्च महिन्यात सुरु होते. २०२० मध्येही या परीक्षा नियोजित वेळेतच पार पडल्या होत्या. मात्र दहावीचा केवळ भूगोल विषयाचा पेपर लॉकडाऊनमुळे लांबणीवर टाकण्यात आला होता. मात्र लॉकडाऊनमुळे पेपर तपासणीला उशीर लागून निकाल विलंबाने लागले. दरम्यान, इयत्ता दहावी, बारावीचे चालू शैक्षणिक वर्ष २०२०-२१ चे वर्ग करोना महामारी स्थितीमुळे ऑनलाइनच सुरू आहेत. परिणामी या परीक्षा कधी होणार, होणार की नाही याबाबत पालक-विद्यार्थ्यांच्या मनात साशंकता होती.
परीक्षांविषयी माहिती देताना गायकवाड म्हणाल्या, ‘करोना विषाणू संसर्गाची सध्याची स्थिती पाहता ही परिस्थिती आणखी काही काळ राहील, असे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही बोर्डाच्या परीक्षा आणि अभ्यासक्रम आदी मुद्द्यांवर चर्चा केली. राज्य मंडळाला मे २०२१ पू्र्वी दहावी, बारावीच्या परीक्षा घेता येणार नाहीत. आम्ही २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे.’
दरम्यान, दिवाळीनंतर २३ नोव्हेंबर पासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष सुरु करण्याच्या प्रस्तावावर राज्य सरकार विचार करत आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
