Nanded News

आदेशित होऊनही दुसर्‍या महसूल आयुक्तालयाचे मुख्यालय नांदेडला का नाही?

 सामाजिक कार्यकर्ते नारायण गायकवाड यांचा सवाल:  मागणीसाठी  न्यायालयीन व रस्त्यावरील आंदोलन करणार मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन
नांदेड:-नांदेड हे सर्वच बाजूने महसूल आयुक्तालयाचे  महत्त्वाचे ठिकाण असून व याबाबत शासन निर्णय आणि न्यायालयाचे आदेश असूनही महसूल विभागाचे विभाजन करून मराठवाड्यातील दुसर्‍या महसूल आयुक्तालयाचेे मुख्यालय नांदेड येथे का होत नाही असा सवाल करतानाच या मागणीसाठी आपण न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत व वेळप्रसंगी रस्त्यावरील आंदोलनही करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते नारायण गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. गायकवाड यांनी या मागणीचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री व महसूल मंत्री तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री यांना दिले आहे.नांदेड मराठवाड्यातील ऐतिहासिक शहर असून हे शहर दक्षिण भारताची गंगानदी म्हणून ओळखल्या जाणार्‍या गोदावरी नदीच्या काठावर वसलेले शहर आहे.

शीख समाजाचे दहावे धर्मगुरु श्री गुरु गोविंद सिंघजी  यांच्या पावन पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी अनेक ऐतिहासिक कारणाने देशाच्या नव्हे तर जगाच्या नकाशात नोंद झालेली आहे. गोदावरी नदीवर  कै. शंकराव चव्हाण जलाशय विष्णुपुरी हे आशिया खंडातील सर्वात मोठे धरण असून या जलाशयाद्वारे नांदेड शहराला २४ तास पाणीपुरवठा होत असतो त्यामुळे हे शहर भविष्यातील मोठे औद्योगिक  शहर आहे. मराठवाड्यातील नांदेड, लातूर, हिंगोली, परभणी या चारही जिल्ह्यात नांदेड शहर हे मध्यवर्ती ठिकाण आहे. नांदेडला आयुक्तालय झाल्यास 400 किमीचा फेरा वाचेल व हे अंतर 150 वर येईल. नागरिकांचा वेळ व पैसा वाचेल भौगोलिक दृष्ट्या पाहिल्यास नांदेडचे क्षेत्रफळ १०५२८ चौ. कि. मी. असून लातूर चे क्षेत्रफळ ७१५७ चौ. कि. मी. तर परभणीचे क्षेत्रफळ ६२५० आणि हिंगोलीचे ४,५२८ चौ. कि. मी.आहे.

त्यामुळे क्षेत्रफळाच्या बाबतीत नांदेड जिल्हा इतर तीन जिल्ह्याच्या मनाने मोठा आहे. तसेच नांदेड येथून परभणी ६९ किलोमीटर हिंगोली ८८ किलोमीटर आणि लातूर १३१ किलोमीटर आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार नांदेड जिल्ह्याची लोकसंख्या ३३  लाख ६१ हजार २६२ आहे तर परभणी १८ लाख ३६ हजार ८३, हिंगोली ११ लाख७७ हजार ३४५ व लातूर २४ लाख ५४ हजार १९६ एवढी लोकसंख्या आहे. वरील परभणी, हिंगोली, लातूर, जिल्ह्याच्या मनाने नांदेड ची लोकसंख्या ही जास्त आहे, नांदेड जिल्ह्यात एकूण १६ तालुके आहेत तर ०८ उपविभाग आहेत. त्यामानाने लातूर जिल्ह्याचे १० तालुके आणि ०५ उपविभाग, परभणीचे ०९ तालुके व ०५ उपविभाग, हिंगोली जिल्ह्यातील ०५ तालुके व ०३ उपविभाग आहेत. नांदेड जिल्हा लातूर, परभणी, हिंगोली, पेक्षा याबाबतीतही सरस आणि योग्य आहे. विशेषत नांदेड जिल्ह्यात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ मध्यवर्ती ठिकाणी आहे. तसेच दळणवळणाच्या सोयीसाठी नांदेड शहर अनेक बाबतीत सरस आहे. नांदेड येथे विमानतळ आहे. त्यामुळे जलद दळणवळणासाठी हे शहर सोयीचे आहे. आजही या चार जिल्ह्याला महत्त्वाच्या व्यक्ती जाताना त्या प्रथम नांदेडला येऊन त्यांना या जिल्ह्यांमध्ये जावे लागते. नांदेड शहरात मोठे रेल्वे स्टेशन असून दिवसाला १०२ रेल्वे  देशातील अनेक भागात ये-जा करत असतात. शैक्षणिक दृष्ट्या नांदेड जिल्हा अनेक अंगाने सोयीस्कर असून जिल्ह्यात ११८ सर्व विषयाचे महाविद्यालय आहेत. तर लातूरमध्ये ११५ ,परभणीमध्ये ७२ , हिंगोली ३७ त्यामुळे इतर जिल्ह्यापेक्षा नांदेड जिल्ह्यात शैक्षणिक दृष्ट्या अनेक सुविधा उपलब्ध आहेत नांदेड जिल्ह्यात श्री गुरू गोविंद सिंगजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी हे महाविद्यालय संपूर्ण भारतातील १०० महाविद्यालय पैकी एक आहे. अशा अनेक अंगाने आयुक्तालयासाठी नांदेड सोयीचे  आहे. असे असले तरी मात्र या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. या प्रकरणी मा. उच्च न्यायालयाचे रिट याचिका क्र.  149/2009,155/2009,394/2009 व 1632/20090 नांदेड येथे दुसरे  महसूल आयुक्तालय  स्थापन करण्याचे आदेशही दिले आहेत.  त्यामुळे नागरिकांच्या हितासाठी कुठल्याही राजकारणाशिवाय नांदेड जिल्ह्याचा दुसर्‍या महसूल आयुक्तालय साठी विचार व्हावा  अशी मागणी नारायण गायकवाड यांनी राज्याचे मुख्यमंत्री,  महसूल मंत्री व सार्वजनिक बंधकाममंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. केवळ राजकीय हव्यासापोटी अतिमहत्त्वाची असलेल्या विषयाला काही माणसं जाणीवपूर्वक खोडा घालत असून आपण या मागणीसाठी सातत्याने न्यायालयीन व वेळ प्रसंगी रस्त्यावरील आंदोलन करणार असल्याचे नारायण गायकवाड यांनी प्रतिनिधीशी बोलताना म्हटले आहे.
%%footer%%