Nanded Marathi News National News

नांदेड:महावितरणची 39 गावात धडक मोहीम’दोन दिवसात 1276 वीजचोर आकोडेबहाद्दरांचा पर्दाफाश

नांदेड: दि.22 ऑक्टोबर : जिल्हयातील वीजचोरीला आळा घालण्याच्या दृष्टिने महावितरणच्यावतीने गेली दोन दिवस आकडे टाकून अनधीकृतपणे वीज चोरून वापरणाऱ्या 39 गावांमधील 1276 वीजचोरांविरोधात आक्रमकपणे मोहीम राबविली गेली. ही मोहिम यापुढेही चालूच राहणार असून जिल्हयातील सर्व उपविभागाअंतर्गत येणाऱ्या वीजचोरी बहूल गावांमध्ये वीजकायदा 2003 अन्वये कारवाई करण्यात येणार आहे.

 महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेश गीते यांच्या निर्देशानुसार वीज चोरीला आळा बसावा, अनधीकृतपणे वीज वापरल्याने रोहीत्रावर जास्त भार येवून रोहीत्र  नादुरूस्त होण्याचे प्रमाण कमी करण्याच्या हेतूने आकडे टाकून वीज वापरणाऱ्यावर कारवाई करण्यात येत आहे. या विशेष मोहीमेला गती देण्याच्या दृष्टीने नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर आणि नांदेड मंडळाचे अधीक्षक अभियंता संतोष वहाणे यांच्या सुचने जिल्हयातील वीजचोरांवरती मोठयाप्रमाणावर कारवाई केली जात आहे. वारंवार अधीकृतपणे वीज कनेकशन घेण्याबाबत विनंती करुनही अनेक लोक वीजेच्या तारेवर आकडा टाकून वीज वापरत असल्याचे दिसून आल्यानंतर गेली दोन दिवस आक्रमकपणे जोरदार मोहीम राबवून भोकर विभागामधील पोमनाळा, देवशीतांडा, शिंदी, कोळी, काळेश्वर,पेवा,पांगरी, कंजारा, कोळेगाव, सावना, बळीराम तांडा, रूई, नीचपुर,राजगड तांडा तसेच सिंदगी या गावांमध्ये 820 वीजचोरांवर कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर देगलूर विभागातील कोकलेगाव,कुंटूर, किनाळा, चाकूर, कावळगाडा व भायेगाव परिसरातील 42 वीजचोरांवरती कारवाई करण्यात आली. नांदेड ग्रामीण विभागातील निवघा, विजापूर, डोणगाव, देगाव, बामणी, लहान , बिजेवाडी,शेकापूर, कवठा तेलपूर फाटा, अंबेसांवगी,पेनूर, मारतळा,कापशी खु.जोशीसावंगी आदी गावामध्ये 297 आकोडे वापरणाऱ्यावर कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर नांदेड शहर विभागांतर्गत 117 आकोडे बहाद्दर वीजचोरांवरती कारवाई करण्यात आली.

  वीज चोरी पकडल्यानंतर ग्राहकांला वीज चोरी केलेल्या युनिटनुसार बिलाची आकारणी करण्यात येते. सदर  आकारणीचे बिल न भरल्यास सबंधितांवर गुन्हाही दाखल होवू शकते. यामध्ये आकडे टाकून विजेचा वापर करणे, शेजाऱ्याकडून अथवा अन्य मार्गाने विजेचा वापर करतांना महावितरण कर्मचाऱ्यांना आढळून आल्यास संबंधित ग्राहकांवर विघुत कायदा 2003 नुसार कारवाई करण्यात येत आहे. यात थकबाकीदार ग्राहकाने शेजाऱ्याकडून विजेचा वापर केल्यास व शेजाऱ्याने परस्पर वीज पुरवठा केल्यास दोघांवरही  कलम 126 नुसार कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये शेजाऱ्याकडून मीटरही बंद होवू शकते. व आकडा टाकून विजेचा वापर करणे, वाहिनीमध्ये छेडछाड करणे  अथवा अन्य मार्गाने विजेचा वापर केल्यास संबंधीत ग्राहकांवर कलम 135, 138 नुसार कारवाई करण्यात येते. पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद होवून संबंधितांना अटकही होवू शकते. या वीज चोरीच्या प्रकरणात गुन्हा सिध्द झाल्यास तीन वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होवू शकते. त्यामुळे अधीकृत वीजजोडणी घेवूनच वीजवापर करावा असे आवाहन महावितरणच्यावतीने करण्यात आले आहे. या मोहीमेसाठी कार्यकारी अभियंता मोहन गोपुलवाड, जनार्दन चव्हाण, श्रीनिवास चटलावार हे परिश्रम घेत आहेत.

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
%d bloggers like this: