NANDED NEWS IN HINDI

नांदेड۔:24 जुलैपासून सोमवार ते शुक्रवारी पर्यंत सकाळी 7 ते सायं. 5 पर्यंत दुकाने

नांदेड۔दि. 23 :- कोराना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यात शुक्रवार 24 जुलै पासून सोमवार ते शुक्रवार या दिवशी दुकाने व इतर खाजगी आस्थापना आदेशातील अटी व शर्तीच्या अधिन राहून (मिशन बिगीन अगेन) सकाळी 7 ते सायं. 5 वाजेपर्यंत चालू ठेवण्यास जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मुभा दिली आहे. नांदेड जिल्ह्यात कोरोना विषाणुची साखळी तोडण्यासाठी व खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

शुक्रवार 24 जुलै 2020 पासून पुढील आदेशापर्यंत (Mission Begin Again) अन्‍वये राज्य शासनाच्या सुचनेनुसार तसेच यापुर्वीच्या आदेशातील नमूद निर्देशानुसार नांदेड जिल्‍हयात प्रतिबंधीत क्षेत्र वगळून खालीलप्रमाणे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मार्गदर्शक सुचना व आदेश निर्गमित केले आहेत.

संपूर्ण नांदेड जिल्‍हयात पुढील प्रमाणे बाबी प्रतिबंधित राहतील

सर्व शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक, प्रशिक्षण संस्‍था व शिकवणी वर्ग इ. बंद राहतील. तथापि ऑनलाईन, आंतर शिक्षण यास मुभा राहील. हॉटेल / रेस्‍टॉरंट आणि इतर हॉस्पिटॅलिटीच्‍या सेवा हया गृहनिर्माण, आरोग्‍य, पोलीस, शासकिय अधिकारी, आरोग्‍य सेवा कर्मचारी, पर्यटकांसह अडकलेल्‍या व्‍यक्‍ती आणि विलगिकरण सुविधेसाठी वापरता येईल. तसेच वरील सेवेसाठीच बसस्‍टॉप, रेल्‍वेस्‍टेशन येथे चालू असलेल्‍या कॅन्‍टीनचा सुध्‍दा वापर करता येईल. रेस्‍टॉरंटला खाद्यपदार्थाच्‍या होम डिलेव्‍हरीसाठी स्‍वयंपाकघर वापरण्‍यास मुभा असेल.

सर्व सिनेमा हॉल, शॉपींग मॉल, व्‍यायामशाळा व जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, थिएटर, बार आणि सभागृह, असेंब्‍ली हॉल व इतर तत्‍सम ठिकाणे बंद राहतील. सर्व सामाजिक, राजकीय, खेळ, करमणूक, शैक्षणिक, सांस्‍कृतिक, धार्मिक कार्ये, इतर मेळावे आणि मोठया धार्मिक सभा यास प्रतिबंध असेल. सर्व धार्मिक स्‍थळे, पुजेची ठिकाणे भाविकांसाठी बंद ठेवण्‍यात येतील. तसेच धार्मिक कार्यक्रम, परिषदा इत्‍यादीवर बंदी राहील.

जिल्ह्यात सायंकाळी 5 ते सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी लागू

संचारबंदी कालावधीत सायं 5 ते सकाळी 7 यावेळेत कोणीही विनाकारण बाहेर फिरु नये. मात्र यामधून अत्‍यावश्‍यक सेवेकरिता नेमण्‍यात आलेले अधिकारी, कर्मचारी व वैद्यकिय कारणास्‍तव रुग्‍ण व त्‍यांच्‍यासोबत असलेले नातेवाईक यांना मुभा राहील. यावेळेत विनाकारण फिरतांना आढळल्‍यास अशा व्‍यक्‍तींच्‍या विरोधात नियमानुसार कार्यवाही करण्‍यात येईल.

आरोग्‍य सेतूचा वापर करावा

आरोग्य सेतुचा वापरामुळे कोव्हिड-19 आजाराच्‍या प्रादुर्भावात त्‍वरीत सूचना मिळते व त्‍याचा फायदा व्‍यक्‍तीस व समाजाला सुध्‍दा होतो. त्‍यामुळे ॲन्ड्राइड फोनचा वापर करणाऱ्या सर्व नागरिकांनी मोबाईल मध्‍ये आरोग्‍य सेतू अॅप डाऊनलोड करावे. शासकिय कार्यालय व खाजगी ठिकाणी काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्‍या व इतरांच्‍या सुरक्षितेसाठी आरोग्‍य सेतु अॅपचा वापर करणे बंधनकारक राहील. नांदेड जिल्‍हयातील सर्व नागरिकांनी आरोग्‍य सेतु अॅप डाऊनलोड करुन त्‍याचा नियमित वापर करावा, असे आवाहन जिल्‍हा प्रशासनाने केले आहे.

आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने धोकादायक वयोगट असणारे 65 वर्षाचे वरिल जेष्‍ठ नागरिक, अनेक व्‍याधी असणारे व्‍यक्‍ती,गरोदर माता, दहा वर्षाखालील मुले यांनी टाळेबंदी काळात अत्‍यावश्‍यक काम, आरोग्य कारणाचे अपवाद वगळता घराबाहेर पडता येणार नाही. त्‍यांनी घरीच राहून प्रशासनाला सहकार्य करावे.

नांदेड जिल्‍हा नॉनरेड झोनमध्‍ये असल्‍याने आदेशातील परिशिष्‍ट तीन मध्‍ये नमुद प्रमाणे आस्‍थापने व दुकाने प्रतिबंधीत क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्रातील दुकाने व खाजगी आस्‍थापनांना केवळ सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी 7 ते दुपारी 5 वाजेपर्यंत चालू ठेवण्‍यास मुभा दिली आहे. परंतू सर्व शासकिय व खाजगी दवाखाने, सर्व औषधी दुकाने वैद्यकिय अत्‍यावश्‍यक सर्व सेवा तसेच पशुवैद्यकिय दवाखाने व औषधालये हे पुर्णवेळ चालू राहतील.

जिल्‍हयातील सर्व शासकीय कार्यालय, बँकेचे सर्व व्‍यवहार पुर्वी दिलेल्‍या निर्देश, अटी शर्तीनुसार कार्यालयीन वेळेत चालू राहतील. क्रीडा कॉम्‍पलेक्‍स आणि स्‍टेडिअम आणि इतर सार्वजनिक खुली जागा वैयक्तीक व्‍यायामासाठी मोकळी राहील. तथापि या ठिकाणी प्रेक्षक आणि ग्रुप ॲक्टीव्हिटीजसाठी मुभा राहणार नाही. सर्व शारीरिक व्‍यायाम व त्‍यासंबंधीत इतर क्रिया सामाजिक अंतर राखुन करता येतील.

सर्व सार्वजनिक आणि खाजगी वाहतुकीस दुचाकी वाहन 1 व्‍यक्‍ती, तीन चाकी वाहन 1 अधिक 2 व्‍यक्‍ती, चार चाकी वाहनासाठी 1 अधिक 2 व्‍यक्‍तींना मुभा राहील. नांदेड जिल्‍हयांतर्गत बससेवा जास्‍तीतजास्‍त 50 टक्‍के क्षमतेनुसार सुरु करण्‍यास मुभा देण्‍यात येत आहे. परंतु सामाजिक अंतर व स्‍वच्‍छतेची उपाययोजना करणे आवश्‍यक राहील. सर्व दुकाने, बाजारापेठ सुरु ठेवण्‍यास मुभा देण्‍यात येत आहे. परंतु उक्‍त दुकाने, बाजारपेठच्‍या ठिकाणी गर्दी वाढल्‍यास किंवा सामाजिक अंतराचे व वेळोवेळी निर्गत आदेशाचे पालन करण्‍यात येत नसल्‍याचे दिसून आल्‍यास दंडात्‍मक व कायदेशिर कार्यवाही करुन दिलेली मुभा रद्द करण्‍यात येईल.

वरील बाबींपैकी प्रतिबंधीत क्षेत्रामध्‍ये केवळ जीवनावश्‍यक वस्‍तुंचा पुरवठा तसेच अत्‍यावश्‍यक वैद्यकीय सेवांना मुभा राहील. जिल्हादंडाधिकारी यांनी निर्गमीत केलेल्या 4 जून 2020 रोजीच्या आदेशानुसार शैक्षणिक संस्‍था (विद्यापीठे,महाविद्यालये,शाळा) या ठिकाणचे कर्मचारी यांना फक्‍त अध्‍यापना व्‍यतिरिक्‍त इतर कामाकरिता कार्यालयात उपस्थित राहून उत्‍तर पत्रिकांचे मुल्‍यांकन आणि परिक्षांचे निकाल यासारखे व इतर कार्यालयीन कामे करण्‍यासाठी मुभा राहील.

जिल्‍हयातील मंगल कार्यालयाच्‍या ठिकाणी केवळ लग्‍नसंमारंभाच्‍या आयोजनाची मुभा 7 व 8 जून 2020 रोजी आदेशातील नियम व अटींच्‍या अधिन राहून राहील. तसेच 7 जुलै 2020 रोजीच्या आदेशान्वये निवास व्‍यवस्‍था असलेले हॉटेल, अतिथीगृह व लॉज चालू ठेवण्‍यासाठी दिलेली मुभा उक्‍त आदेशात नमुद नियम व अटींच्‍या अधिन राहून लागु राहील.

वरील दुकाने / आस्‍थापनाच्‍या ठिकाणी उपाययोजना बंधनकारक राहिल

कामाच्‍या ठिकाणी, दुकानात प्रवेशापुर्वी हॅन्‍डवॉश, सॅनिटायझरचा वापर करावा. एका वेळेस दुकानात पाच पेक्षा जास्‍त ग्राहकास प्रवेश राहणार नाही. दुकानातील कर्मचारी व ग्राहक यांच्‍या चेह-यावर मास्‍क असणे व सामाजिक अंतराचे पालन करणे अन्‍यथा 1 हजार रुपये एवढा दंड संबंधितांकडून आकारण्‍यात येईल. मानवी संपर्कात येणाऱ्या सर्व वस्‍तू, ठिकाणांचे वेळोवेळी नियमीत र्निजंतूकीकरण करणे. ग्राहकांकडून खरेदीनंतर पैशांची देवाण-घेवाण आरबीआयच्‍या सुचनेनुसार ई-वॉलेटस व स्‍वाईप मशीनद्वारे करण्यास भर द्यावा. वरील नेमून दिलेल्‍या वेळेनंतर दुकान चालू ठेवल्‍यास तसेच उपाययोजनेचे भंग केल्‍यास 5 हजार रुपये एवढा दंड संबंधित दुकानदारास आकारण्‍यात येईल.

सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क परिधान करणे अनिवार्य आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्‍यास 1 हजार रुपये दंड आकारण्‍यात येईल. सार्वजनिक कामाची ठिकाणे व सार्वजनिक वाहतूक या ठिकाणी सामाजिक अंतराचे नियम पाळावेत. लग्नसमारंभ निमित्ताने होणारे जमाव संबंधाने सामाजिक अंतराचे नियम पाळावे व अशा ठिकाणी 50 पेक्षा जास्त आमंत्रित असु नयेत. तसेच लग्‍न सकाळी 7 ते सायंकाळी 5 या कालावधीतच पार पाडणे आवश्‍यक असेल. अंत्यविधीमध्ये सामाजिक अंतराचे नियम पाळले जावेत व 50 पेक्षा जास्त लोकांचा सहभाग असु नये. दारु, पान, गुटखा, तंबाखू इत्याचे चे सार्वजनिक ठिकाणी सेवन निषिद्ध आहे अन्‍यथा कायदेशिर कारवाई करण्‍यात येईल.

सर्व दुकाने ही दोन ग्राहकामध्ये सहा फूट अंतर या नियमांनुसार व एका वेळेस 5 पेक्षा जास्त लोक जमा होणार नाहीत, अशा प्रकारे चालु राहतील. कामाचे ठिकाणी अवलंबवायच्या अतिरिक्त मार्गदर्शक सुचना थर्मल स्क्रीनींग, हॅंडवाश, सॅनिटायजर्स हे कामाचे ठिकाणी प्रवेश व निर्गमन मार्गावर तसेच सामान्य ठिकाणी उपलब्ध करुन द्यावे. कामाचे संपूर्ण क्षेत्र वारंवार मानवी संपर्कात येणारी ठिकाणे उदा. दरवाज्याचे कडी-कोंडी इत्याचे चे निर्जंतुकीकरन वारंवार तसेच शिफ्ट दरम्यान करावे. सर्व प्रभारी अधिकारी व संबंधितांनी कामाचे ठिकाणी कामगारांमध्ये पुरेशा प्रमाणात अंतर ठेवून सामाजिक अंतर राखले जावे. तसेच शिफ्ट दरम्यान अंतर ठेवावे व जेवणाच्या वेळा नियंत्रित कराव्यात.

रेड झोनव्‍यतिरिक्‍त भागात व प्रतिबंधित क्षेत्रात परवानगी नसलेल्या बाबी हवाई, रेल्‍वे व मेट्रो प्रवास, आंतरराज्‍य मार्ग वाहतूक, शैक्षणिक संस्‍था, आदरातिथ्‍य, हॉटेल्‍स, शॉपिंग मॉल्‍स, प्रार्थनास्‍थळे व मोठया प्रमाणावरील जमावाची ठिकाणे, 65 वर्षे वयावरील व 10 वर्षे वयाखालील तसेच गरोदर स्त्रिया यांची बाहेर ये-जा, आंतर जिल्‍हा बससेवेला परवानगी राहणार नाही.

रेड झोनव्‍यतिरिक्‍त भागात परवानगी दारुची दुकाने, वैद्यकिय सुविधा पुरविणारे दवाखाने, क्‍लीनिक (ओपीडी), टॅक्‍सी, कॅब, रिक्‍शा 1 अधिक 2 व्‍यक्‍ती, चार चाकी वाहने 1 अधिक 2 व्‍यक्‍ती, दुचाकी वाहने 1 व्‍यक्‍ती, जिल्‍हांतर्गत बससेवा, औद्योगिक आस्‍थापना (शहरी) व (ग्रामीण), शहरी भागातील सीटू बांधकाम, इतर खाजगी बांधकाम स्‍थळे, शहरी एकल विक्रेता दुकाने, ई-कॉमर्स अंतर्गत अत्‍यावश्‍यक वस्‍तू, ई-कॉमर्स अंतर्गत अत्‍यावश्‍यक नसलेल्‍या वस्‍तू, खाजगी कार्यालये, शासकीय कार्यालये (शंभर टक्के उपस्थिती), कृषिविषयक कार्य, बँक आणि वित्‍त, कुरियर व पोस्‍टल सेवा, केश कर्तनालय दुकाने, स्‍पा, सलून, प्रेक्षकांव्‍यतिरिक्‍त स्‍टेडियम, घरपोच सेवा देणारे रेस्‍टॉरंट, दुय्यम निबंधक, प्रादेशिक परिवहन, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय रेड झोनव्‍यतिरिक्‍त भागात सुरु राहण्यास परवानगी आहे तर प्रतिबंधीत क्षेत्रात याबाबींना परवानगी राहणार नाही.

रेड झोनव्‍यतिरिक्‍त व प्रतिबंधित क्षेत्रात मालाचा पुरवठा, अत्‍यावश्‍यक सेवा पुरविणारी दुकाने, वैद्यकिय अति तात्‍काळ सेवांची हालचाल या सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

आदेशात नमुद संपुर्ण निर्देशाचे तंतोतंत पालन होते किंवा नाही याबाबी तपासून आवश्‍यक कायदेशिर व दंडात्‍मक कारवाई करण्‍यास पुढील यंत्रणेस प्राधिकृत करण्‍यात आले आहे. महानगरपालिका हद्दीत, महानगरपालिका व पोलीस विभागांनी संयुक्‍त पथके गठीत करावीत. नगरपालिका हद्दीत, नगरपालिका व पोलीस विभाग यांनी संयुक्‍त पथके गठीत करावीत. गावपातळीवर, ग्रामपंचायत व पोलीस विभागाचे संयुक्‍त पथक गठीत करावे.

वरीलप्रमाणे सर्व संबंधित यंत्रणेने पर्यवेक्षणासाठी गठीत केलेले पथकाचे आदेश संबंधित उपविभागीय दंडाधिकारी तथा(Incident Commander) यांचेकडे सादर करावीत. संबंधित उपविभागीय दंडाधिकारी तथा (Incident Commander) यांची वरीलप्रमाणे आदेशाची अंमलबजावणीच्‍या अनुषंगाने संनियंत्रणाची जबाबदारी असेल.

या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्‍यक्‍ती, संस्‍था अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्‍यात येईल व कारवाई करण्‍यात येईल. तसेच यापुर्वी निर्गमित केलेल्‍या आदेशानुसार दंडात्‍मक कार्यवाही सुध्‍दा करण्‍यात येईल.

सर्व संबंधित यंत्रणांनी अत्‍यावश्‍यक साधने व सुविधांची साठेबाजी, काळाबाजार करणाऱ्या विरुध्‍द कठोर कारवाई करावी. तसेच वरील आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सद्हेतुने केलेल्या कृत्‍यासाठी कुठल्‍याही अधिकारी व कर्मचारी यांच्यावर विरुध्‍द कुठल्‍याही प्रकारची कायदेशिर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही. हा आदेश दि. 19 जुलै 2020 रोजी जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमित केला आहे.

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
%d bloggers like this: